अभिजात मराठी साहित्यकृतींवर आधारित चित्रपटांची निर्मिती हे उद्दिष्ट ठेवून स्थापन करण्यात आलेल्या “पर्व क्रिएशन्स” या निर्मितीसंस्थेचा औपचारिक शुभारंभ आणि “श्री पार्टनर” या चित्रपटाचा मुहूर्त ज्येष्ठ दिग्दर्शक श्री. राजदत्त यांच्या हस्ते नुकताच मुंबईत एका शानदार समारंभात पार पडला.

यावेळी या चित्रपटातले प्रमुख कलावंत ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर, लालन सारंग आणि ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार, व.पु.काळे यांच्या कन्या आणि ज्येष्ठ साहित्यिका स्वाती चांदोरकर,व.पुं.चे सुपुत्र सुहास काळे तसेच मराठी चित्रपट तसेच उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मराठीतले जवळपास सर्वच यशस्वी चित्रपट साहित्यकृतींवर आधारित आहेत आणि ह्याच गोष्टीचे विस्मरण अलीकडच्या काळात होत होते ,म्हणून पुन्हा एकदा साहित्याकडे वळण्याचा ठोस प्रयत्न या दृष्टीकोनातून “पर्व क्रिएशन्स” या निर्मितीसंस्थेची स्थापन केल्याचे यावेळी संचालक समीर रमेश सुर्वे यांनी सांगितले. याच समारंभात पर्व क्रिएशन्सची प्रथम निर्मिती असलेल्या समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित “श्री पार्टनर” या चित्रपटाचा मुहूर्त कलावंत आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
व.पु.काळे यांच्या सुप्रसिद्ध पार्टनर कादंबरीवर हा चित्रपट आधारित असून “पार्टनर” च्या मुख्य भूमिकेत सतीश पुळेकर तर मध्यवर्ती भूमिकेत लालन सारंग असून प्रायोगिक रंगभूमीवरचा चतुरस्त्र अभिनेता पद्मनाभ बिंड या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत दिसेल.पुण्याची श्वेता पगार ही नवोदित अभिनेत्री या चित्रपटाद्वारे नायिका म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटातल्या सहकलावंतांची निवड मुंबई आणि पुण्यात निवड चाचणी घेऊन करण्यात आली आहे.या निवड चाचणीत एकंदर ७५० कलावंत सहभागी झाले त्यापैकी १६ जणांची निवड करण्यात आली. या चित्रपटात दिपक कदम, आकांक्षा मेहेंदळे, आनंद पानसे, दिनेश कानडे, राहुल कुलकर्णी, सिद्धार्थ बेंद्रे, अंजली गोडबोले,आरती पाटील,राधिका सुवर्णपत्की,मंदार पाठक, आनंद बापट, कुशल कोळी, डॉ.संजीवकुमार पाटील, विद्याधर परांजपे, संजय देशपांडे सह कलावंत आहेत.
या चित्रपटाचे छायाचित्रण राजा फडतरे करणार असून कलादिग्दर्शन दत्ता लोंढे यांचे आहे.या चित्रपटाला सध्याचे आघाडीचे संगीतकार निलेश मोहरीर यांनी संगीत दिले असून गीत अश्विनी शेंडे यांची आहेत. बेला शेंडे,मधुश्री आणि स्वप्नील बांदोडकर यांनी या गीतांना स्वर दिला असून पार्श्वसंगीताची जबाबदारी निलेश डहाणूकर सांभाळणार आहेत.नृत्य दिग्दर्शन दिपाली विचारे यांचे असून संकलक योगेश गोगटे आहेत. ध्वनी – राशी बुट्टे ,वेशभूषा -बाळकृष्ण जावकर,रंगभूषा- दिनेश नाईक सांभाळतील.जनसंपर्काची जबाबदारी गणेश गारगोटे यांच्याकडे असून कीर्तीकुमार नाईक आणि आशिष काळे कार्यकारी निर्माते आहेत. गंधर्व पेडणेकर,अजित म्हसकर, समीर रमेश सुर्वे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
‘श्री पार्टनर’च्या चित्रीकरणास लवकरच पुण्यामध्ये सुरवात होत असून हा चित्रपट येत्या सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित करण्याचा चित्रपट निर्मात्यांचा मानस आहे.

